जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचा विक्रम!

तरुण भारत लाईव्ह न्युज : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गतच्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना वेग आला आहे. जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जल जीवन मिशनच्या कामांना गती यावी, यासाठी मक्तेदरांच्या दोनदा बैठका घेतल्या. त्यात मक्तेदारांच्या पाणी योजनांचे काम सुरू करतांना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. तसेच काम सुरू न करणार्‍या मक्तेदारांना मागील आठवड्यातच ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने १७० ठेकेदारांना नोटीसा बजावल्या होत्या.

मात्र पुढील नोटीस दंडात्मक कारवाईची देण्याचे आदेश सीइओंनी दिल्याने पाणी योजनांचे ठेकेदार कामाला लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १४०० योजनांपैकी एक हजार योजनांच्या कामांचा श्रीगणेशा झाला आहे. उर्वरीत कामे उद्घाटनासाठी थांबविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीईओंच्या ऍक्शननंतर जिल्ह्यातील पाणी योजनांची कामे जोरात सुरू झाली आहेत. त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश भोगावडे यांचाही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे यंदा पाणी योजना तात्काळ कार्यन्वित झाल्यास अनेक तालुके टँकरमुक्त होणार असल्याचे जाणकाराचे मत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी ३०० ते ३५० पाणी योजना होत असत. मात्र यंदा जिल्ह्यात पहिल्यादा एकाच वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत दीड हजार पाणी योजना होणार आहेत. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचा हा यावर्षांतला मोठा विक्रम राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर जल घर घर जल अभियानांतर्गत जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर पाणी योजनांना मोठ्या संख्येने प्राधान्य देण्यात येत आहे.

मक्तेदारांना मिळणार तातडीने बिलाचे देयके

जल जीवन मिशनचे काम करणार्‍या ठेकेदारांना तातडीने बिलाचे देयके अदा करण्यासाठी आधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून मक्तेदारांची तातडीने बीलांची देयके अदा होणार आहेत. जलजीवन मिशनच्या कामांची बीले काम केल्यानंतर ठेकेदारांना त्वरीत दिले जाणार असल्याने कामांनाही वेग आला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने या कामांना गती देणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने सीईओंनी प्राधान्याने या कामांचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परिणामी यंदा सर्वाधिक पाणी योजना कार्यन्वित होणार आहेत. ना.गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पाणीपुरवठा मंत्री असल्याने जिल्ह्यात पाणी योजना मोठ्या प्रमाणात मंजुरी देण्यात आली आहे.

जलजीवनच्या कामातील अडथळे बीडीओ सोडविणार

जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामातील स्थानिक अडचणी तालुक्यातील बीडीओ आणि ग्रामसेवकांनी तातडीने सोडविण्याच्या सूचना जि.प.सीईओ डॉ.आशिया यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले. स्थानिक गावातील जागेचा प्रश्‍न किंवा इतर कोणी त्यात अडचणी निर्माण करीत असतील तर थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. त्यामुळे या योजना राबविण्यासाठी बहुतांश ठिकाणी जागेच्या अडचणी किंवा स्थानिक मक्तेदाराला काम न मिळाल्याने या योजनेला विरोध होत असल्याचे समोर येत आहे. मात्र सीईओंनी या योजनेच्या कामात अडथळा आणणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशाने देऊन बीडीओ पातळीवर अडचणी सुटल्या नाही तर त्यासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

सिंचन विभागाचे कामकाज थंडावले

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाची कामे थंडावल्याचे चित्र आहे. सिंचन विभागाचा सर्वांधिक निधी अखर्चित आहे. त्यामुळे इतर विभगाच्या तुलनेत सिंचन विभागाची सर्वाधिक कामे प्रलंबित आहेत. सिंचन विभागातील कामांतील दिरंगाई आणि कासव गतीने सुरू असलेल्या कामकाजामुळे २० कोटीचे ३९ कामे आचाचरसंहितेत अडकली होती. या कामांच्या टेंडर प्रकियेला सुरूवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकर्‍यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून जास्तीत क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी सिंचन विभागाच्या कामांना विशेष महत्व आहे. या विभागांतर्गतची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित असते. कारण बंधार्‍यांची कामे पावसाळ्यात करता येत नाही. मात्र उन्हाळ्याच्या तीनच महिन्यात सिंचनाची कामे पूर्ण करण्यास संधी असते. ही कामे उन्हाळ्यातील आगामी तीन महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास पुढील काळात पावसाळ्यात ही कामे करता येणे शक्य नाही. त्यामुळे य कामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यातच मिनी बंधारे, केटीवेअर यांची कामे जि.प.च्या सिंचन विभागाला पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सिंचन विभागाच्या कामांकडे सीईओंनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कॉफीमुक्त अभियानासाठी सकारात्मक पाऊल

जिल्ह्यात कॉफीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कॉफीमुक्त वातावरणात परिक्षा होतील , असे चित्र दिसत आहे. केंद्रचालक व मुख्याध्यापकांच्या बैठकीत जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी कॉफीमुक्त अभियान राबविण्याच्या सूचना देत कॉफी आढळून आल्यास संबंधित केंद्रचालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे यंदा दहावी, बारावीची परिक्षा कॉफीमुक्त वातावरणात होणार आहेत. त्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्याव्दारे या परिक्षा केंद्रावर नजर ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील दहावी, बारावीची परिक्षा कॉफी मुक्त वातावणात व्हाव्यात यासाठी जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शाळांच्या मुख्याध्यापक, केंद्रचालकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यात त्यांना आवश्यक त्या सर्व बाबींच्या पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी वेळोवेळी कार्यशाळेत मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते.