Jam Deposit Scam : ऑनलाइन फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे वापरणाऱ्या सायबर ठगांनी आता आणखी एक नवा फंडा शोधला आहे. या नव्या युक्तीमधून ते ग्राहकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. ‘जॅम डिपॉझिट स्कॅम’ (Jam Deposit Scam) असे या नव्या फसवणुकीचे नाव असून, यात सायबर ठग ग्राहकांच्या खात्यात ठरावीक रक्कम जमा करतात आणि नंतर संपूर्ण बँक खाते रिकामे करतात.
फसवणुकीची पद्धत
सायबर ठग प्रथम ग्राहकाच्या बँक खात्यात दोन ते पाच हजार रुपये जमा करतात. ग्राहकाला ‘तुमच्या खात्यात पैसे आले’ असा एसएमएस पाठवला जातो. पैसे खात्यात जमा झाल्याचे पाहून ग्राहक आनंदित होतो आणि खात्री करण्यासाठी तत्काळ यूपीआय (UPI) अॅप उघडतो. मात्र, हा मेसेज खरा नसून एक पेमेंट रिक्वेस्ट असते. ग्राहक घाईघाईत यूपीआय पिन टाकतो आणि त्याच क्षणी त्याच्या बँक खात्यातील पैसे कापले जातात.
अशाप्रकारे होते आर्थिक फसवणूक
- सायबर ठग ग्राहकाच्या खात्यात काही रक्कम जमा करतात.
- त्यानंतर ‘तुमच्या खात्यात पैसे आले’ असा बनावट मेसेज पाठवला जातो.
- ग्राहक यूपीआय अॅप उघडतो आणि पिन टाकताच पेमेंट रिक्वेस्ट अॅप्रूव्ह होते.
- ठग ग्राहकाच्या संपूर्ण बँक खात्यावर डल्ला मारतात आणि मोठ्या रकमेची फसवणूक करतात.
असा टाळा ‘जॅम डिपॉझिट स्कॅम’चा फंद
- तत्काळ प्रतिक्रिया देऊ नका – अनोळखी क्रमांकावरून ‘पैसे आले’ असा मेसेज आल्यास २०-३० मिनिटे कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका.
- यूपीआय पिन चुकीचा टाका – खात्यात पैसे पडल्याचा मेसेज आल्यास, खात्री करण्यासाठी जाणूनबुजून चुकीचा यूपीआय पिन टाका. त्यामुळे जर तो फसवणुकीचा प्रयत्न असेल, तर तो अयशस्वी ठरेल.
- बँक बॅलन्स स्वखर्चाने तपासा – थेट बँकेच्या अधिकृत अॅप किंवा नेटबँकिंगद्वारे तुमचे बँक बॅलन्स तपासा.
- अनोळखी कॉल टाळा – अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल शक्यतो उचलू नका. फसवणुकीसाठी गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा.
- शंका आल्यास बँकेशी संपर्क साधा – जर तुम्हाला कोणत्याही आर्थिक व्यवहाराबद्दल शंका वाटत असेल, तर त्वरित बँकेशी संपर्क साधा आणि योग्य ती उपाययोजना करा.
सायबर सुरक्षेसाठी सतर्क राहा!
सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही आर्थिक व्यवहारांसाठी सतर्कता ठेवणे आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या मेसेजवर त्वरित विश्वास ठेऊ नका. तुमचे बँक खाते आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घ्या आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.