---Advertisement---
जामनेर : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, तसेच शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून जामनेर तालुक्यात सर्वत्र अवकाळी पाऊस धो-धो कोसळत असून, परिणामी कापूस, केळी, मका तसेच इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या परिस्थितीत आधीच बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर दिलीप बळीराम खोडपे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना सध्या प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने तात्काळ मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.”
बच्चू कडू यांनी उभारलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचा जाहीर पाठिंबा असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या निवेदन प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









