---Advertisement---
जळगाव : जामनेर शहरात काल, सोमवारी एका २१ वर्षीय तरुणाचा अमानुषपणे मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सुलेमानखान रहिमखान पठाण (वय २१, रा.छोटा बेटावद, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुण सुलेमानखान रहिमखान पठाण (वय २१) हा ११ रोजी गावातील स्वतः च्या शेतात १० वाजेपर्यंत शेतीचे काम केले. त्यानंतर सुलेमानखन हा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी व फॉर्म भरण्यासाठी जामनेर येथे जाऊन येतो, असे घरच्या मंडळीना सांगून तो बेटावद खुर्द येथून ११ वाजेच्या एसटी बसने जामनेर येथे गेला, अशी माहिती त्याच्या नातेवाईक मंडळीकडून मिळाली.
जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये तो गेला असता त्याला काही तरुणांकडून मारहाण झाली. त्यानंतर त्याला त्याच्या मूळ गावी म्हणजे बेटावद खुर्द येथे मारहाण करणारेच तरुण घेऊन गेल्याचे समजते. घरी पोहचल्यानंतर त्याने फक्त पाणी पिल्याचे व आपल्यासोबत घडलेली घटना त्याने घरच्यांना सांगितली.
या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे असून मयत सुलेमानखन यांच्या नातेवाईकांनी येथील पोलीस स्टेशनसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. मारहाणीचे कारण मात्र समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जामनेर पोलीस स्टेशनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली व झालेल्या घटनेची माहिती घेतली.