जामनेरात अवैधरीत्या गुरांची वाहतूक रोखली : दोघांना अटक

तरुण भारत लाईव्ह न्युज जामनेर : जामनेर पोलिसांनी गुरांची कत्तलीच्या उद्देशाने होणारी निर्दयी वाहतूक रोखत चार गुरांची सुटका केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. भुसावळ ते जामनेर रोडवर असलेल्या मराठी शाळेजवळून एका वाहनात तीन गायी, एक वासरू आणि एक गोर्‍हा यांना दोरीने घट्ट बांधून निर्दयीपणे वाहतूक करताना आढळल्यानंतर सुज्ञ नागरीकांनी वाहन तातडीने थांबविले. यासंदर्भात विचारपूस केली असता संबंधिताने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने जामनेर पोलिसांना माहिती कळवून त्यांच्या ताब्यात वाहनासह संशयित देण्यात आले.

जामनेर पोलिसांनी वाहन ताब्यात घेत त्यातील 60 हजार रुपये किंमतीच्या तीन गायींसह वासरू व गोर्‍ह्याची सुटका केली. या प्रकरणी सुभाष अजून पवार (38, कस्तुरी नगर, जामनेर) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शेरू मोहम्मद हुसेन कुरेशी (26), आणि नितीन राजेश पाटील (29, दोन्ही रा.सिल्लोड, जि. संभाजीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जयेंद्र पगारे करीत आहे.