---Advertisement---
मुंबई : मराठा आरक्षणावर विधिमंडळात चर्चा सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, अशी भूमिका सर्वपक्षीय आमदारांनी घेतली असून सभागृहात ती मांडण्यातही आली. मात्र, ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाऊ नये, अशी मागणी केली आहे. २५ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याचा शब्द सरकारने दिला होता. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी पत्रकारांशी बोलताना पुढील भूमिका स्पष्ट केली.
जरांगे पाटील म्हणाले की, २४ तारखेपर्यंत मी कुणावर बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज कोण आहे, हे सगळ्यांना कळेल. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले तर पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होतं. त्याच अनुषंगाने आज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. आमदार बच्चू कडू यांच्याकडे ते पत्र आहे, ज्यात सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होतं, असे जरांगे यांनी म्हटलं. १७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
ते म्हणाले की, सरकारने आम्हाला जे लिहून दिलं होतं, त्यानुसार १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होतं. मात्र, अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होतं, त्याचे व्हिडिओही आहेत. जर १७ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही, त्याबाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा-आमचा विषय संपला. त्या दिवशीच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं.









