भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापतीमुळे बेड रेस्टचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा काही दिवसांपासून जोरात सुरू होती. मात्र, आता खुद्द बुमराहने या चर्चांवर पडदा टाकत तब्येतीसंदर्भात खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेट संघात नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील जसप्रीत बुमराहच्या भेदक कामगिरीची चर्चा असतानाच, त्याच्या दुखापतीमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बुमराहने 32 विकेट्स घेतल्या आणि मालिकावीर म्हणून निवड झाला. मात्र, अंतिम सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी केली नव्हती, यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेची लाट पसरली होती.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बुमराहच्या पाठीवर सूज असल्याचा दावा काही अहवालांत करण्यात आला होता. या दुखापतीमुळे त्याला ‘बेड रेस्ट’चा सल्ला देण्यात आला असून, बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला भेट देणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले. मात्र, याच चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी बुमराहने स्वतः पुढाकार घेतला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बुमराहने ट्विट करत, “मला माहित आहे की खोट्या बातम्या पसरवणे सोपे आहे, पण या दाव्यांमुळे मला हसू येत आहे. Sources unreliable (सूत्रं अविश्वसनीय आहेत),” असा टोला लगावत त्याच्या दुखापतीच्या बातम्या फेटाळून लावल्या.
बीसीसीआयने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही, मात्र बुमराहच्या ट्विटमुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे, आणि बुमराहचा या स्पर्धेत सहभाग हा संघासाठी निर्णायक ठरेल.