Jasprit Bumrah : आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआय लवकरच संघाशी घोषणा करणार आहे. पण या महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टीम इंडियालाच नव्हे तर बीसीसीआयलाही टेन्शनमध्ये टाकलं आहे. एकूणच जसप्रीत बुमराहचा हा निर्णय बोर्डासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर नवीन कर्णधाराचे नाव २४ मे रोजी जाहीर करणार आहे. आतापर्यंत कर्णधारपदासाठी ज्या खेळाडूंची नावे चर्चेत आहेत, त्यात शुभमन गिलचे नाव सर्वात वर आहे. तसेच ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचाही विचार केला जात आहे.
बुमराहच्या निर्णयावर बीसीसीआय शोधतेय पर्याय
खरं तर टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामने खेळावयाचे आहेत. पण जसप्रीत बुमराह सर्व सामने खेळू शकणार नसल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे संघ अडचणीत आला आहे. जसप्रीत बुमराहने म्हटले आहे की, त्याचे शरीर आता जास्त कामाचा भार सहन करू शकत नाही. इंग्लंड दौऱ्यावर तो ३ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे बीसीसीआय बुमराहसाठी नवीन पर्याय शोधत आहे.
निवड बैठकीत बुमराह म्हणाला की, सध्या त्याचे शरीर तीन कसोटी सामन्यांपेक्षा जास्त खेळू शकत नाही. बुमराहने ऑस्ट्रेलियामध्ये पाचही कसोटी सामने खेळले होते. त्याने तिथे अनेक लांब स्पेलही टाकले. पण पाचव्या कसोटीदरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली आणि तो सामन्याबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत होती आणि टीम इंडिया सामना गमावली. इंग्लंड दौऱ्यावरही पाच कसोटी खेळावयाचे आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीबद्दल आधीच भीती आहे. त्याला काही सामन्यांमध्ये विश्रांती दिली जाऊ शकते.
पाठीची शस्त्रक्रिया
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी कसोटीदरम्यान त्याच्या पाठीत सूज आली होती. यामुळे त्याला काही महिने मैदानापासून दूर राहावे लागले. तो आयपीएल २०२५ चे काही सामनेही चुकला. २०२३ मध्येही बुमराहला पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. या दुखापतीमुळे तो जवळजवळ एक वर्ष क्रिकेट खेळू शकला नाही. पुन्हा त्याच भागात झालेल्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे.