Jaya Verma : रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांनी आज रेल्वे भवन येथे पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने रेल्वे बोर्डाच्या (रेल्वे मंत्रालय) नव्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून जया वर्मा सिन्हा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. भारतीय रेल्वेच्या या सर्वोच्च पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
याआधी जया वर्मा सिन्हा यांनी रेल्वे बोर्डामध्ये सदस्य (ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट) म्हणून काम केले आहे. भारतीय रेल्वेवरील मालवाहतूक आणि प्रवासी सेवांच्या एकूण वाहतुकीची जबाबदारीही सिन्हा यांच्यावर होती. जया वर्मा सिन्हा 1988 मध्ये भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत (आयआरटीएस) रुजू झाल्या.
भारतीय रेल्वेतील 35 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी रेल्वे बोर्डात सदस्य (ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट), अतिरिक्त सदस्य, (रहदारी (ट्रॅफिक) आणि वाहतूक) अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तसेच, जया वर्मा सिन्हा यांनी ऑपरेशन्स, कमर्शियल, आयटी आणि व्हिजिलन्स अशा विविध विभागांमध्येही काम केले आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या प्रधान मुख्य ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
त्यांनी ढाका, बांगलादेश येथील भारतीय उच्चायुक्तालयात रेल्वे कामकाज सल्लागार म्हणून काम केले होते, त्यांच्याच या कार्यकाळात कोलकाता ते ढाका या प्रसिद्ध मैत्री एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले होते. जया सिन्हा अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना फोटोग्राफीची आवड आहे.