मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर शरद पवारांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी समितीची स्थापना केली होती. पण, या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वांनुमते फेटाळला. यानंतर शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहात असल्याची घोषणा केली.
भाकरी फिरविणार असं आपण जाहीर केलं होतं. पण, राजीनामा मागे घेत भाकरी थापली आहे, असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. मात्र, शरद पवारांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेऊन बसले होते,, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांचा रोख कोणाकडं होता, यावरुन तर्कवितर्क लढविले जावू लागले आहेत.
एका सभेत बोलताना जयंत पाटलांनी म्हटलं, शरद पवारांच्या राजीनाम्याने वादळ निर्माण झालं होतं. बरेच लोक देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. शरद पवार नसते, तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, ही शक्यता आता मावळली आहे, असेही त्यांनी नमुद केले.