Sanjay Shirsat : मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची सतत चर्चा होत असते. मात्र, अनेकदा मंत्रीमंडळ विस्ताराचे मुहूर्त हुकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, याच मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले आहे शिरसाट ?
शिरसाट म्हणाले की, “भाजपबरोबर जाण्याचा जयंत पाटील यांनीच प्रस्ताव दिला होता. याबाबत चर्चा झाली होती, आपण सर्व मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे बैठकीमध्ये ठरलं होतं. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे, आमच्या माहितीप्रमाणे जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता, असे शिरसाट म्हणाले आहेत. तसेच, त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आले नसतील. पण ते येतील आणि त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही,” असेही शिरसाट म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत ते बोलत होते.