मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार, अजित पवारांचे पारडे जड असून बोटावर मोजता येणाऱ्या आमदारांचा अपवाद वगळता सर्वांनीच अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. अनेक बडे नेते अजितदादांसोबत आहेत. शरद पवारांसोबत असलेल्या बड्या नेत्यांमध्ये केवळ जयंत पाटील यांचे नाव येते मात्र आता जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची चर्चा आहे.
शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरले आहे असा हल्लाबोल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. हे बडवे नेमके कोण याची चर्चाही त्यावेळी रंगली होती आणि त्यानिमित्ताने जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड अशी नावे समोर आली होती. मात्र आता जयंत पाटील यांना सोबत घेण्याच्या इराद्याने अजित पवार गट कामाला लागला आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे समजते.
पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर टीका करत शरद पवार गटाचा किल्ला जयंत पाटील यांनीच लढवला होता.
शरद पवार यांच्यासोबत असलेले बरेच आमदार गेल्या आठ दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत त्यात राजेंद्र शिंगणे मकरंद पाटील किरण लहामटे यांचा समावेश आहे. आशुतोष काळे परदेशात होते. परतल्यानंतर ते थेट अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. अद्याप शरद पवार यांच्यासोबत असलेल्यांपैकी काही आमदार नक्कीच आमच्यासोबत येतील असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे.