सांगली : गेल्या काही दिवसात ठाकरे गटाच्या नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी झाली तर आता राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण १४ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाती उघडून मोठी रक्कम रोकड स्वरुपात वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे व्यवहार बँकेने लपवून ठेवल्याचाही आरोप आहे. या कथित घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सामील असल्याचा संशय ईडीला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित ही बँक आहे.
सांगली शहरातील इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणार्या सुरेश आणि दिनेश पारेख बंधू, अरविंद आणि ऋषिकेश लढ्ढा या चार बड्या व्यापार्यांसह पिंटू बियाणी या व्यापार्यावर काल ईडीच्या पथकांनी छापे टाकून तपासणी केली आहे. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ११ वाहनांमधून ६० अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. तर या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या पाच व्यापार्याकडे चौकशी करताना ईडीने व्यापार्याची खाती असलेल्या संबधित बँकेत देखील चौकशी केली आहे. यामध्ये पेठ येथील राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापार्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री अडीच वाजता ईडीचे अधिकारी संपूर्ण चौकशी आटपून मुंबईकडे रवाना झाले आहेत.