अजित पवारांबाबत जयंत पाटलांच सूचक विधान; वाचा काय म्हणाले…

तरुण भारत लाईव्ह | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार यांच्यात राजकीय सामना रंगतांना दिसत आहे. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे मोठे नेते वगळता बहुतांश मोठे नेते अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. अशात जयंत पाटील देखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांसोबत जातील, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांना सोडून गेले ते आजही साहेबांना मानतात. ते आग्रहाने सांगतात की, ते माझा विठ्ठल आहे. जे गेले ते शरद पवार यांचा फोटो लावतात. त्यावर मी आक्षेप घेणे बरोबर नाही. शरद पवार राजकारणात त्यांना आणले नसते तर ते आजपर्यंत या ठिकाणी पोहोचले नसते. अजित पवार आणि माझ्यामध्ये कोणतेच वाद नाहीत. आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्यासोबत राहिलोय, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक बाहेर आले. त्यानंतर आम्ही काहीजणांनी जाऊन त्यांची भेट घेतली. मलिक यांना किडनीचा त्रास सुरु झाला आहे. विश्रांती घेण्यासाठी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ते राजकीय विषय कोणाशीही बोलत नाहीत, त्यामुळे त्यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, त्यांच्यासंदर्भात राजकीय बोलून मी त्यांना अडचणीत आणणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक खूप लांब आहे. पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्याविरोधात जनता आहे आणि जनतेपर्यंत जाऊन शरद पवार आपली भूमिका मांडत आहेत. शरद पवार साहेब यांच्याबद्दल हसन मुश्रीफ यांना आदर आहे. मात्र, त्यांनी हा निर्णय का घेतला हे तेच सांगतील. कोल्हापूरच्या सभेत याची उत्तरे मिळतील. महाविकास आघाडीच्या सभा लवकर सुरु होतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.