तरुण भारत लाईव्ह । पुणे : विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक जयंत श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचे शुक्रवारी (२ जून) निधन झाले. मागील वर्षी झालेल्या रस्ता अपघातापासून ते आजारी होते. ते ५७ वर्षांचे होते. सहस्रबुद्धे यांचा जन्म १७ एप्रिल १९६६ रोजी गिरगाव (मुंबई) येथे झाला. त्यांना घरातूनच संघकार्याचा वारसा मिळाला होता. वडील श्रीकांत सहस्त्रबुद्धे हे आजही संघकार्याशी जोडलेले आहेत. मुंबई विश्वविद्यालयातून बी. एससी. इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर येथे काही काळ नोकरी केली. त्यानंतर १९८९ मध्ये ते नोकरी सोडून पूर्णवेळ संघ प्रचारक बनले. सहस्रबुद्धे यांच्याकडे २००९ पासून विज्ञान भारतीच्या राष्ट्रीय संघटन सचिव पदाचे दायित्व होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक आणि सुमारे ४० वर्षांपासून मित्र असलेले, असामान्य प्रज्ञा आणि प्रतिभेचे धनी जयंत सहस्रबुद्धे यांच्या अकाली मृत्यूची वार्ता अत्यंत वेदनादायक आहे. जयंतजींनी विज्ञान भारतीच्या कार्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. दिवंगत कार्यकर्त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जयंतरावांच्या निधनामुळे विज्ञानाच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघणारी नसली तरी जयंतरावांनी आखून दिलेल्या मार्गावर सर्व विज्ञानप्रेमींनी कार्य करून विज्ञानाला तळागाळापर्यंत पोहोचवावे, तीच या विज्ञान तपस्वीला परिपूर्ण श्रद्धांजली ठरेल, अशी प्रतिक्रिया परभणी एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सहसचिव प्रसाद वाघमारे यांनी दिली.