Jayesh Marathe : नंदुरबारचा जयेश झाला लेफ्टनंट…

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील खरवड येथील तरुण जयेश मराठे याची इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली असून नंदुरबार जिल्ह्यातून लेफ्टनंट होण्याचा मान मिळविणारा जयेश मराठे हा दुसरा विद्यार्थी ठरला आहे.

त्याचे गावात आगमन झाल्यानंतर त्याची वाजत- गाजत मिरवणूक काढण्यात आली. जयेश छोटू मराठे (उगले) याने आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या पदाचा मान मिळविला आहे. लेफ्टनंट पदाबाबतचे चेन्नई येथे देण्यात आलेले ११ महिन्यांचे प्रशिक्षण त्याने नुकतेच पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे खरवड येथील आपल्या राहत्या घरी आगमन झाले.

त्याने खरवडचे नाव देशपातळीवर नेल्यामुळे तो कौतुकास पात्र ठरल्यामुळे खरवड गावकऱ्यांच्या वतीने त्याची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी सरपंच प्रमिलाबाई आत्माराम पाडवी, आत्माराम पाडवी, उपसरपंच नीताबाई गोसावी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी तन्हावद येथील सरपंच दिलीप ठाकरे, कृष्णा गोसावी व खरवड ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तत्पूर्वी लेफ्टनंट जयेश मराठे याची ढोल- ताशांच्या गजरात फुले उधळून गावातून मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी जयेश मराठे याला माता-भगिनींनी आरती ओवाळून आशीर्वाद दिला. त्याचबरोबर तरुणांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. १ ऑक्टोबर २०२३ पासून लेफ्टनंट जयेश मराठे हा राजस्थानमधील जैसलमेर येथे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार
आहे.