कोरोनाचे नवीन उप-प्रकार JN.1 हळूहळू पसरत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला केरळमध्ये याची पुष्टी झाली. त्यानंतर गोवा आणि महाराष्ट्रातही त्याची प्रकरणे आढळून आली. आता JN.1 देशातील आठ राज्यांमध्ये पसरला आहे. याशिवाय कोरोनाचे नवीन रुग्णही सातत्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. तीन संक्रमित लोकांचाही मृत्यू झाला आहे.
त्यापैकी गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34, गोव्यात 24, महाराष्ट्रात नऊ, केरळमध्ये सहा, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी चार आणि तेलंगणामध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केरळमध्ये सापडल्यानंतर ज्या पद्धतीने त्याची प्रगती होत आहे, त्या आधारावर असे मानले जाते की लवकरच दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही जेएन.१ चे रुग्ण सापडतील. दरम्यान, आता केंद्र आणि राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे.
कर्नाटकात दोघांचा, तर गुजरातमध्ये एकाचा मृत्यू
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवे रुग्ण आढळले आहेत. आता कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4093 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूमुळे २४ तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन प्रकरणे कर्नाटकातील असून एक गुजरातमधून समोर आला आहे. वाढत्या कोरोना संसर्ग आणि थंडीमुळे या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे मानले जात आहे. देशात कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४.४ कोटींवर पोहोचली आहे.