नोकरीसाठी इतर शहरांतील उमेदवारांना प्राधान्य

तरुण भारत लाईव्ह । दत्तात्रेय आंबुलकर ।

Wipro Company विप्रोसारख्या प्रस्थापित संगणकीय कंपनीने नव्या कर्मचार्‍यांची निवड करताना विविध राज्यांतील वेगवेगळ्या शहरांतील चांगल्या संस्था वा विद्यापीठातून उत्तम गुणांकांसह उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थी उमेदवारांचा प्रसंगी प्राधान्यपूर्वक विचार करण्यास सुमारे दशकापूर्वी सुरुवात केली. संगणक सेवा क्षेत्र व तत्सम क्षेत्रातील कंपन्या आता विविध स्तरावरील विशेषत: नवागत वा नव्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आपल्याकडील नोकरीसाठी प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. पूर्वापार वा प्रस्थापित स्वरूपातील संगणक सेवा क्षेत्रात उमेदवारांची कर्मचारी म्हणून निवड करताना प्रामुख्याने व प्राधान्याने आयआयटी व आयआयएम या तद्वत महानगरीय पठडीतून बाहेर पडून मोठ्या कंपन्या उमेदवारांची निवड करताना इतर शहरे व तेथील विद्यार्थी उमेदवारांचा आवर्जून विचार करतात, ही बाब नववर्षाच्या सुरुवातीला लक्षणीय ठरते.
Wipro Company विप्रोसारख्या प्रस्थापित संगणकीय कंपनीने नव्या कर्मचार्‍यांची निवड करताना विविध राज्यांतील वेगवेगळ्या शहरांतील चांगल्या संस्था वा विद्यापीठांतून उत्तम गुणांकांसह उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थी उमेदवारांचा प्रसंगी प्राधान्यपूर्वक विचार करण्यास सुमारे दशकापूर्वी सुरुवात केली. विप्रो व्यवस्थानातील प्रमुख त्रयी असणार्‍या श्रीधर मित्ता, आनंद तलवाई वा मिथाईल रमेश या तत्कालीन उच्चपदस्थांनी एका सामाजिक जबाबदारीचा उपक्रम म्हणून या प्रकल्पाची सुरुवात केली. यासाठी पहिल्या नेक्स्ट वेल्थ या माहिती संकलन व्यवस्थापन कंपनीने पुढाकार घेतला. कंपनीने महानगरांशिवाय इतर मोठ्या वा मध्यम शहरांमधील उमेदवारांचा, त्यांच्या योग्यतेनुसार प्राधान्याने विचार करण्यासाठी योजनापूर्वक पुढाकार घेतला. कंपनीच्या उद्देश संकल्पात मुळी समाज प्रथम, फायदा अखेर, असे नमूद करण्यात आले व त्यानुरूप कंपनीने आपले काम नेटाने सुरू केले. कंपनीच्या व्यवसायात माहिती, तपशील वा तथ्याचे संकलन, विश्लेषण, संशोधन, प्रकाशन यांचा समावेश ठेवण्यात आला.
नेक्स्ट वेल्थने आपल्या या नव्या प्रयत्नांना सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरक, सामाजिक व शुचितापूर्ण व्यवहारांचा पाया घातला व हा नेम प्रकर्षाने पाळला. या Wipro Company सामाजिकदृष्ट्या व्यवसायपूरक उपक्रमाचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्राच्या आसपास राहणार्‍यांचा विचार सुरू केला. त्यामध्ये अर्थातच स्थानिक विद्यार्थी, उमेदवारांना कंपनीच्या गरजा व उमेदवारांची योग्यता सांभाळून प्राधान्य देण्याचा दूरगामी व धोरणात्मक निर्णय घेऊन तो राबविला. कंपनीचे संस्थापक-संचालक श्रीधर मित्ता यांच्या मते, स्थानिक समाजाशी समन्वयासह सहकार्य करण्याचा एक भाग म्हणून आम्ही स्थानिकांच्या रोजगाराचा विचार करतो. योग्य-कार्यक्षम व त्याचबरोबर क्रियाशील उमेदवार मिळाल्याने आमचे कामकाजच नव्हे, तर व्यवसायात प्रगती होऊन तो अधिक फायदेशीर होतो. स्थानिक कर्मचार्‍यांना, त्यांच्या क्षमतेनुसार प्राधान्य देण्याच्या या प्रयत्नांनी नेक्स्ट वेल्थला इतर संगणक सेवा क्षेत्रात विशेष व्यावसायिक स्थान प्राप्त झाले आहे. मध्यम व छोट्या शहरांतील उमेदवारांना व्यावसायिकदृष्ट्या कर्मचारी म्हणून घेण्यातून काय आणि कसे फायदे होऊ शकतात, याचा यानिमित्ताने अभ्यास करण्यात आला. यासंदर्भात सकृतदर्शनी असे आढळून आले की, देशपातळीवर संगणक, संगणकसेवा-बीपीओ या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना कर्मचार्‍यांची नेहमीच गरज भासते. ही नेहमीची व वाढती गरज भागविण्यासाठी संगणक क्षेत्रातील सर्वच मोठ्या व प्रस्थापित कंपन्या सर्वसाधारणपणे देशातील दहा मोठ्या वा महानगरीय शहरांवरच आपले लक्ष केंद्रित करतात. यातून त्यांना आवश्यक असे शिक्षित वा पात्रताधारक विद्यार्थी उमेदवार मिळत असल्याने महानगरातील उमेदवारांचाच विचार करण्याचा प्राधान्यक्रम संगणक व्यवसाय क्षेत्रात आहे.
या Wipro Company संदर्भातील एक वस्तुस्थिती म्हणजे इतर उद्योग-व्यवसाय क्षेत्रांप्रमाणेच संगणक शास्त्र-सेवाक्षेत्रात रोजगारासाठी विद्यार्थी तर खूप मिळतात. मात्र, निवड करण्यासाठी योग्य व पात्रताधारक उमेदवारांची मात्र नेहमीच वानवा असते. त्यामुळे नेहमीच्या व निवडक महानगरांमधीलच संगणक पात्रताधारक उमेदवारांची निवड झाल्यास उमेदवारांची संख्या आणि निवडीला मर्यादा पडतात. दरम्यान, संगणक सेवा कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रकार आणि प्रमाण कायम असते. त्यामुळे महानगरे वा मोठी शहरे सोडून इतर शहरांमधील संगणक क्षेत्रातील पात्रताधारक उमेदवारांचा निवडीसाठी विचार होणे अधिक व्यवहार्य व प्रसंगी आवश्यक ठरते. सकृतदर्शनी पाहता मध्यम वा विद्यापीठ स्तरावरील ठिकाणांहून संगणक विज्ञान वा शास्त्र विषयातील पदवी वा तत्सम पात्रताधारक विद्यार्थ्यांपैकी सुमारे 40 टक्के विद्यार्थी हे याच क्षेत्रात नोकरी-रोजगारासाठी महानगरांची वाट धरतात. या पृष्ठभूमीवर मध्यम शहरांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली व त्याला चांगला प्रतिसादही मिळू लागला. राष्ट्रीय स्तरावर विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात विशेष सेवा केंद्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर सेवा देणार्‍या कंपन्यांमध्ये सुमारे 4,500 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अधिकांश कर्मचार्‍यांची निवड तामिळनाडूतील शालेय व वेल्लोर, आंध्र प्रदेशातील चित्तूर, कर्नाटकातील हुबळी व म्हैसूर, छत्तीसगडमधील भिलाई यासारख्या जिल्हास्तरीय ठिकाणांहून करण्यात आली, हे विशेष.
नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड सर्व्हिस कंपनीला, या संस्थेद्वारे 2022 मध्ये महानगरांच्या तुलनेत छोट्या म्हणजे दुसर्‍या वा तिसर्‍या श्रेणीतील विद्यार्थी उमेदवारांमधून सर्वाधिक पात्रताधारक उमेदवारांची निवड करणारी म्हणून विशेष स्वरूपात पुरस्कृत करण्याचे घोषित केले आहे. संस्थेनुसार, अशा प्रयत्नांमुळे मध्यम वा लहान शहरांमधील गरजू व पात्रताधारक उमेदवारांना प्रोत्साहन तर मिळेलच, शिवाय मोठ्या शहरांमधील मोठ्या कंपन्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पात्रताधारक कर्मचारी निश्चित कालावधीत मिळतील. आपल्या या प्रयत्नांना पूरक ठरण्यासाठी असोसिएशनतर्फे आपल्या सदस्य कंपन्यांना, त्यांनी निवडलेल्या व हुशार उमेदवारांना संबंधित कौशल्यासह प्रशिक्षित करण्यासाठी सूचित केले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून, त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे. छोट्या शहरांमधील विद्यार्थी-उमेदवारांची निवड करण्यामागे कंपन्यांचा सामाजिक दृष्टिकोनसुद्धा दिसून येतो.
एका प्रमुख Wipro Company संगणकीय कंपनीने भविष्यातील कर्मचार्‍यांची निवड करताना मध्यम शहरांमधील उमेदवारांची निवड करतानाच त्यामध्ये महिला कर्मचार्‍यांचे प्रमाण सुमारे 50 टक्के राखण्यावर प्रयत्नशील राहण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अशा प्रयत्नांमुळे लहान शहरांमधील गरीब व गरजू उमेदवारांचा विचार करताना पात्रताधारक महिला उमेदवारांना प्रोत्साहन देण्यातून आर्थिक-सामाजिक परिवर्तनाला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे. याच प्रयत्नांचा एक पुढील टप्पा म्हणून या कंपन्यांनी उमेदवारांची निवड करताना पात्रताधारक अशा दोन टक्के दिव्यांग उमेदवारांची निवड करण्याचा आग्रह धरला असून, त्यालाही सदस्य कंपन्यांकडून सकारात्मक व प्रयत्नशील प्रतिसाद मिळू लागला आहे. संगणक सेवा व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांच्या कंपनी स्तरावर अथवा सामूहिक स्वरूपात सुरू असणार्‍या ध्येय-धोरणांची जोड मिळण्याची सुरुवात निश्चितपणे झाली आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून मध्यम वा छोट्या शहरातील विद्यार्थी-उमेदवारांना अधिक चांगल्या रोजगार संधी व महानगरी कंपन्यांना पात्रताधारक उमेदवार मिळण्याचे परस्परपूरक व सकारात्मक परिणाम दिसून येतील.