मुंबई : राज्य सरकारच्या कौशल्य विभागाच्या पुढाकाराने १ लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिंदे -फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखाहून अधिक रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोशयारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
राज्य सरकारने ४४ नामांकित उद्योजक, प्लेसमेंट एजन्सी, कौशल्य विभागाचे आयुक्त यांच्यासमावेत केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील १ लाखाहून अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यात प्रामुख्याने हॉस्पिटॅलिटी, मीडिया अँन्ड एन्टरटेन्मेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन या क्षेत्रात दहावी पास-नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूर केली. १० लाख रोजगार देण्याचा निर्णय केला. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने ७५ हजार बेरोजगारांना नोकर्या देण्याचा निर्णय केला. त्याचसोबत खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असं त्यांनी सांगितले. नोकरीची संधी निर्माण करायची असेल तर कौशल्य विकास हे महत्त्वाचं माध्यम आहे. आम्हाला प्रशिक्षित माणसं मिळत नाही असं उद्योजक सांगतात तर तरुण आमच्या हाताला काम नाही ही दरी संपवण्यासाठी कौशल्य विभाग काम करतंय. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन हाताला काम देण्याची जबाबदारी या विभागाने उचलली आहे. शेती क्षेत्राला सेवा, उत्पादन क्षेत्राशी जोडल्यानंतर शेतीवरील २० टक्के भार कमी होतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.