नाट्य परिषदेच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष मात्र जळगावसह धुळे जिल्ह्याचा निकाल ठेवला राखून

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज निवडणूक अधिकाऱयांनी घोषित केला. नियामक मंडळाच्या ६० पैकी ५८ विजयी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. धुळे आणि जळगाव या दोन जिह्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत, ढोलताशांच्या गजरात परिषदेच्या यशवंत नाट्य संकुलातील कार्यालयाबाहेर जल्लोष केला.

निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एक जागेसाठी मतदान झाले, मात्र उमेदवारांनी हरकत घेतल्याने तांत्रिक कारणांनी या दोन्ही जिह्यांचे निकाल २९ एप्रिलपर्यंत राखून ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भातील अहवाल निवडणूक अधिकाऱ्यांनी मागविला असून त्याचा अभ्यास करून निर्णय देण्यात येणार आहे.

आता नुतन अध्यक्ष कोण?

प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाने मुंबईतून दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईतून रंगकर्मी नाटक समूहाचे ८ तर मुंबई उपनगरांतून २ उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’ला मुंबईतून २ आणि मुंबई उपनगरांतून २ जागा मिळाल्या आहेत. रंगकर्मी नाटक समूहाला उर्वरित महाराष्ट्रातील सदस्यांचा मोठय़ा प्रमाणात पाठिंबा असल्याचे समजते. आता नाट्य परिषदेचे नवे अध्यक्ष कोण, याची चर्चा आहे. उर्वरित महाराष्ट्रातील सदस्यांना कार्यकारिणीत किती आणि कसे स्थान मिळणार, हे देखील लवकरच समजेल.