---Advertisement---
यावल : येथे दोन दिवसापुर्वी यावल शहराला व संपुर्ण परिसरातील नागरीकांच्या मनाला सुन्न करणारी घटना घडली असुन, या घटनेत शहरातील बाबुजीपुरा येथे राहणाऱ्या एका सहा वर्षीय हनान खान नांवाच्या बालकाचा एका माथेफिरु तरूणांने र्निघृणपणे खुन करून त्यास जाळल्याची अमानवीय संतापजनक घटना घडली आहे.
या बाळाचा खुन करणारा शेख शाहीद शेख बिस्मील्ला या तरूणाविरोधात जलदगती न्यायालयात हा खटला चालवुन त्यास कडक शासन व्हावे या मागणीसाठी आज सोमवारी (८ सप्टेंबर) रोजी मयत बालकाच्या घरापासून तहसिल कार्यलयापर्यंत सर्वधर्मीय नागरीकांच्या वतीने मुक मोर्चा काढून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाचा आशय असा होता की, यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवासी हन्नान खान (वय ६) हा मजीद खान यांचा मुलगा शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजेपासून बेपत्ता असल्याची तक्रार आई-वडिलांनी केली. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, अखेर शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलीफा दस्तगीर खलीफा यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर एका कोठीत जळालेल्या अवस्थेत मिळून आला. आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याने जुन्या वादातून हन्नान शेख याला पहिले गळा दाबून ठार मारले. नंतर जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. शेख शाहिद शेख बिस्मिल्ला यास जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यास कडक शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , माजी उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी, माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान, काँग्रेस कमेटीचे यावल शहराध्यक्ष मोहम्मद हकीम शेख, अनिल जंजाळे, सामाजिक कार्यकर्ते पराग सराफ, नरेन्द्र शिंदे, गोलु माळी, शिवसेना उबाठाचे हुसैन तडवी, यावलचे माजी नगरसेवक मनोहर सोनवणे यांच्यासह मोठया संख्ये नागरीक या मुक मोर्चात सहभागी झाले होते .