Nandurbar: समाजाच्या विकासासाठी न्याय प्रस्थापित व्हावा : न्यायाधीश भूषण गवई

Nandurbar : समाजाच्या विकासासाठी सामाजिक,आर्थिक न्यायप्रस्थापित व्हावा या दृष्टिकोनातून अनेक सकारात्मक कायद्यांची निर्मिती करण्यात आली.स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर समाज विकसित होत असतांना दिसून येत असून, समानतेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.आदिवासींच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. न्यायाच्या हक्क सर्वांच्याच आहे. शेवटच्या घटकापर्यंत पोचून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हायला पाहिजे असे प्रतिपादन दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई Judge Bhushan Gavai यांनी केले.

नंदुरबार तालुक्यातील केवडीपाड्यात विधी साक्षरता अभियानाचे उद्घाटन, विधायक समिती संचलित अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळेच्या नवीन इमारत व लोकनेते बटेसिंगभैय्या रघुवंशी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण न्या. गवई यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल,महाराष्ट्र व गोवा बार कन्सिलाचे अध्यक्ष ॲड.परिजात पांडे, नवीदिल्लीचे बार कौन्सिलने सदस्यॲड.जयंत जयभावे,महाराष्ट्र व गोवा बार कन्सिलाचे माजी अध्यक्ष ॲड. राजीव पाटील,उच्च न्यायालयाचे मुख्य सरकारी अभियोक्ता ॲड.अमरजितसिंह गिरासे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र व गोव्याचे बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप,सदस्य ॲड.उदय वारुंजीकर,ॲड.संग्राम देसाई, ॲड.आशिष देशमुख, ॲड. अनिल गोवरदिपे,ॲड.हर्षद निंबाळकर, ॲड.सतीश देशमुख, ॲड.अमोल सावंत, ॲड. उच्च न्यायालय बार कौन्सिल औरंगाबाद येथील उच्च न्यायालय बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. एन.एल जाधव उपस्थित होते.

यावेळी न्या. गवई म्हणाले,आदिवासी समाजाचे युवक डॉक्टर, वकील आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. विधायक समितीच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थी आज वकिली क्षेत्रात काम करीत असल्याची बाब भूषणावह आहे. समाजात बदल, क्रांती घडवून आणण्याची शक्ती वकिलांमध्ये असून,सामाजिक,आर्थिक समानता आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रास्ताविक भारत सरकारचे माजी अप्पर माजी महाभियोक्ता ॲड.राजेंद्र रघुवंशी यांनी केले.आभार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.डी चौधरी यांनी केले.

प्रसंगी संस्थेचे चेअरमन तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी,संचालक ऍड.राम रघुवंशी उपस्थित होते.

कोकणी,पारंपरिक आदिवासी नृत्याने भारावले न्यायमूर्ती

न्यायमूर्ती भूषण गवई व मान्यवरांचे स्वागतासाठी सकाळपासूनच पारंपारिक आदिवासी,कोकणी नृत्य व डफ वाजंत्री पथक दाखल झाले होते.सकाळी ११.३० वाजता गावात त्यांचे आगमन होताच महिलांनी औक्षण करीत स्वागत करण्यात आले.यावेळी पारंपारिक आदिवासी,कोकणी नृत्य व डफ वाजंत्रीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पावरी वाद्य भेट

आदिवासी समाजाची एक विशिष्ट ओळख असलेल्या पावरी वाद्य न्यायमूर्तींना भेट देण्यात आले.यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकलात केला.आदिवासी वाद्यातील प्रमुख सुरवाद्य पावरीकडे पाहिले जाते.भरतप्रणीत वाद्य वर्गीकरणानुसार सुषिरवाद्य आणि वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितवायूस्तंभ या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे.

 लोकनेते स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशींच्या पुतळ्याचे लोकार्पण

शैक्षणिक क्षेत्रात, लोकनेते माजी आ.स्व. बटेसिंगभैय्या रघुवंशी यांचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रेरणा मिळावी यासाठी विधायक समितीचा केवडापाडा येथील बटेसिंगभैय्या रघुवंशी यांच्या पुतळ्याचे लोकार्पण न्या. गवई यांच्या हस्ते करण्यात आले. नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माध्यमातून बटेसिंगभैय्या रघुवंशी यांनी विद्यार्थी घडवण्याचे काम केल्याचे न्या.गवई यांनी सांगितले.