Kalyan Crime News : अवघ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा आरोपी विशाल गवळी याने कारागृहात स्वत:ला संपवलं आहे. नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत, आरोपी विशाल गवळी याने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याने सदर मुलीची हत्या करून मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. घटनेनंतर पसार झालेल्या विशाल गवळीला शेगाव पोलिसांनी सापळा रचत ताब्यात घेतले होते.
दरम्यान, विशाल गवळी हा कल्याणमधील सराईत गुंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. विशाल गवळीवर अत्याचार करणे, अत्याचाराचा प्रयत्न करणे, छेडछाड करणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद असून, कल्याण पूर्व परिसरात त्याच्या दहशतीमुळे अनेक कुटुंब हे परिसर सोडून गेल्याचे समोर आले आहे.
तसेच विशाल गवळीचे आतापर्यंत तीन लग्न झाली असून, त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. दरम्यान, विशाल गवळी याच्या पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केल्याची माहिती तपासात समोर आलीय.