कामदा एकादशी व्रत : होईल प्रत्येक इच्छा पूर्ण! जाणून घ्या सविस्तर

तरुण भारत लाईव्ह ।१ एप्रिल २०२३। एकादशीचे व्रत केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते. एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजे भगवान विष्णू, कृष्ण किंवा त्यांचे अवतार ज्यांची या दिवशी पूजा केली जाते. चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व असून त्यामुळे मन आणि शरीर दोन्ही संतुलित राहतात. यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी. या एकादशीचे एक नाव फलदा एकादशी देखील आहे. यावेळी कामदा एकादशीचे व्रत 01 एप्रिल म्हणजेच आज पाळले जात आहे.

शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कामदा एकादशी व्रत केले जाते. कामदा एकादशी आज रात्री 01:58 वाजता सुरू झाली आहे आणि 02 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या पहाटे 04:19 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार कामदा एकादशी 01 एप्रिललाच साजरी केली जाईल. कामदा एकादशीचे पारण 02 एप्रिल रोजी दुपारी 01:40 ते संध्याकाळी 04:10 पर्यंत असेल.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यांना पिवळी फुले, पंचामृत आणि तुळशीची पाने अर्पण करा. यानंतर भगवान विष्णूचे ध्यान करा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा. या दिवशी फलाहार करा, यामुळे तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. जर तुम्ही फक्त एका वेळ उपवास करत असाल तर दुसऱ्या वेळेत वैष्णव भोजन म्हणजेच कांदा लसून नसलेले भोजन करा. दुसऱ्या दिवशी सकाळी एका वेळचे अन्न किंवा धान्य एखाद्या गरीबाला दान करावे. या दिवशी परमेश्वराचे नाम स्मरण करा.

जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसमोर हळदीच्या दोन गाठी अर्पण करा. असे केल्याने तुमची समस्या लवकर दूर होईल. कामदा एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात आनंद येईल.जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा स्पष्ट जप करा. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशीच्या पूजेमध्ये भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूचे फूल अर्पण करा. कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा. असे केल्याने तुमचे दु:ख दूर होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.