Kanbai Utsav : खान्देशात आजपासून घरोघरी कानुबाई उत्सव

 Kanbai Utsav : पावसाच्या कृपेमुळे संपूर्ण खान्देशात आबादाणी आहे. त्यात श्रावण लागला की, सर्वांना वेध लागतात ते, कानुबाई उत्सवाचे. खान्देशात आजपासून सर्वत्र मोठ्या संख्येने कानबाई उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवासाठी बाहेरगावी गेले कुटुंबे एकत्र येत आहेत.

आज, शनिवारपासून कानुबाई उत्सवाला सुरुवात होउन रविवार आणि सोमवार मातेचे विसर्जन होणार आहे. कानुबाई उत्सवासाठी सर्वांना एकत्र यावे लागत असल्याने हा उत्सव कुटुंब व भावकीत एकोपा निर्माण करणारा आहे.

श्रावणातील पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. काही भागात दुसऱ्या अथवा चौथ्या रविवारीही कानुबाईची प्रतिष्ठापना केली जाते. कानुबाईचा उत्सव हा तसा दोन दिवसांचा असतो. मात्र, पाच दिवसांत कानुबाईचे रोट (प्रसाद) खावे लागतात. खान्देशात श्रावण महिन्यात पहिल्या रविवारी मातेची स्थापना केली जाते. कानुबाईच्या उत्सवात कुटुंबातील ज्येष्ठांना मान दिला जात असतो.

त्यामळे नोकरी किंवा उद्योग-धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंबातील इतर सदस्यही या उत्सवास आवर्जुन हजेरी लावत असतात. संपूर्ण कुटुंब कानुबाईची विधिवत पूजन करतात. कानुबाईला पिवळा, लाल अथवा गुलाबी पितांबर नेसवला जातो. मोत्याची नथ, मंगळसूत्र, हार, हिरवा चुडा आदी आभूषणे चढवून घरात नव्या कोऱ्या साड्यांची सजावट करून कानुबाईची स्थापना होते.

रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानबाईला चौरंगावर बसवून डोक्यावर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून- नऊवारी साड्या अथवा लुगडी परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गात पाण्याचा सडा टाकला जातो.

उत्सवासमयीचे एक दृश्य कानुबाई नवसाला पावल्यास गव्हाचे ‘रोट’, त्यासोबत तांदळाच्या गोड खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अर्थातच देवीच्या नावाने नवस मानलेला असताना रोटांसाठी दळलेले जाडभरडे पीठ संपत नाही तोपर्यंत घरोघरी दोन-तीन दिवस दुसरा स्वयंपाक करत नाहीत. सोबत ‘आलन कालन’ ही विविध पालेभाज्यांचे मिश्रण केलेली भाजी बनवली जाते.