कंगना रणौतला मिळणार लोकसभेचं तिकिट? वाचा काय म्हणाली

मुंबई : बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत तिच्या परखड व स्पष्ट वक्तव्यांमुळे ओळखली जाते. ती नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असते. मात्र तिने राजकारणात येण्याबद्दल कधीच भाष्य केलेलं नव्हतं. मात्र आता कंगनाने पहिल्यांदाच राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे अभिनेत्री म्हणाली. अलीकडेच अभिनेत्रीचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्यानिमित्ताने देवर्शनासाठी ती द्वारकाधीश मंदिरात पोहोचली होती. त्यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलतांना कंगणा म्हणाली की, देताना असे म्हटले की, जर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर ती लोकसभा निवडणूक लढवू शकते. यावेळी बोलताना तिने द्वारका शहराबद्दलही भाष्य केले. तिने या शहराबद्दल बोलताना असे म्हटले की, ‘हे खूपच अद्भूत आहे. मी नेहमी म्हणते की, द्वारकानगरी ही दिव्य नगरी आहे. कामातून जेव्हा संधी मिळेल तेव्हा इथे येऊन परमेश्वराचे दर्शन घेतले पाहिजे. सरकारने जर सुविधा उपलब्ध करुन दिली तर अशी इच्छा आहे द्वारकेचे जे पाण्याखाली अवशेष आहेत, ते पाहता यावेत. आपल्या महान इतिहासाचे नगर आणि कृष्णजी यांची नगरी असणारी द्वारका माझ्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीये.’

कंगना दोन महिन्यांपूर्वीच राजकारणाबाबत भाष्य करताना राजकारणातील प्रवेशाबद्दल बोलली होती. कंगनाला अलीकडेच सप्टेंबरमध्ये एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तिचा राजकारणात प्रवेश करण्याचा काही विचार आहे का? टाइम्स नाऊशी झालेल्या संवादात कंगना म्हणाली होती की, ‘कलाकार असल्यामुळे मला राजकारणात रस आहे, पण आत्ता ही राजकारणाशी जोडले जाणे माझ्यासाठी खूप घाई होईल.’ यावेळी कंगनाने मोदी सरकारचे कौतुकही केले होते. तिने असे मत व्यक्त केले की, मोदी सरकारमुळे देशात अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि आपला भारत दिवसेंदिवस चांगला होत आहे.