दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या कन्नड अभिनेत्री रान्या रावला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता, तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वृत्तानुसार, ही अभिनेत्री दुबईहून मोठ्या प्रमाणात कपड्यांमध्ये सोन्याची बिस्किटं लपवून सोन्याची तस्करी करत होती. पोलीस प्रशासन अभिनेत्रीच्या वारंवार होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहलींवर लक्ष ठेवून होतं.
ही अभिनेत्री १५ दिवसांत चार वेळा दुबईला गेली होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि संधी मिळताच त्यांनी अभिनेत्रीवर कारवाई केली.
बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिची झडती घेतली असता, तिच्याकडे १४.८ किलो सोनं आढळून आलं. तसेच प्राथमिक तपासात असंही समोर आलं आहे की, कस्टम इन्वेस्टिगेशन टाळण्यासाठी अभिनेत्रीनं शिफारसींचा वापर केला असावा. तिनं कर्नाटकच्या डीजीपीची मुलगी असल्याचा दावा केला आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांमुळे ती सहज घरी पोहोचली असल्याचं बोललं जात आहे.
आता या सोन्याच्या तस्करीत अभिनेत्री ही एकटीच सहभागी आहे की, ती दुबई आणि भारतादरम्यान चालणाऱ्या मोठ्या स्मगलिंग नेटवर्कचा भाग आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.