नवी दिल्ली : कर्नाटक विधान सभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार आणि १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
कर्नाटकच्या २२४ विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, अनुसूचित जातीसाठी ३६ जागांवर आरक्षण आहे, तर अनुसूचित जमातींसाठी १५ जागा राखीव आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी १० मे रोजी मतदान घेण्यात येणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यासाठी, अर्ज करण्यासंदर्भातील नोटीफिकेशन १३ एप्रिल रोजी निघणार आहे. कर्नाटक मध्ये ५८,२८२ मतदान केंद्र असून २०,८६६ शहरी केंद्र आहेत.
कर्नाटकमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. मात्र, भाजपने २२४ जागांपैकी सर्वाधिक १०४ जागा जिंकत वर्चस्व मिळवले होते. तर, काँग्रेसने ८० जागा जिंकल्या होत्या, जेडीएसने ३७ जागा जिंकल्या. मात्र, सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला होता. अखेर, भाजपने बंडखोर आमदारांसोबत एकत्र येत कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली, तेव्हा मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा हे होते.