भाविकांनी भरलेल्या बसचा अपघात; 13 जणांचा मृत्यू

बंगळूरु : कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. तीर्थयात्रेवरुन परतणारी एक मिनी बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बसचालकाला झोप लागल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भाविक शिवमोगाचे रहिवासी होते. ते देवी यल्लम्माचे दर्शन घेऊन बेळगावी जिल्ह्यातील सावदट्टी येथून परतत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.