अंगावर उकळतं पाणी पडल्याने कार्तिकचं जीवन संपलं, कुटुंबावर शोककळा

नांदेड : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षीय बालकाच्या अंगावर गरम पाणी पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक पांडुरंग शिंदे (वय ५, रा.डोलारा) असेल मयत बालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्रानुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील डोलारा या गावात ही घटना घडली आहे. कार्तिक हा दगडाच्या चुलीवर आंघोळीसाठी ठेवलेले पाणी उकळत असताना सकाळी बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी चुलीजवळ बसून उब घेत होता. त्याचा धक्का त्या चुलीच्या दगडाला लागला आणि चुलीवर असलेले उकळते गरम पाणी त्याच्या अंगावर पडले. उकळते पाणी त्याच्या अंगावर पोटावर पडल्याने तो गंभीर भाजला.

दरम्यान, नातेवाईक व फडावरील कामगारांनी कार्तिकला पुढील उपचारार्थ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

शिंदे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
ऊसतोड कामगार पांडुरंग सत्ताजी शिंदे हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील ऊसतोड करणाऱ्या टोळीसोबत पत्नी व दोन लहान मुले घेऊन ऊसतोडीसाठी ऊस फडातील कामावर होते. दरम्यान, मुलाच्या अंगावर उकळते पाणी पडून त्याचा मृत्यू झाल्याने पांडुरंग शिंदे यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.