कसबा अन् चिंचवडची पोटनिवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे मोठं भाष्य

मुंबई : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असणार आहे. मात्र याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना महत्वाचं आवाहन केलं आहे.

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपले उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करा, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या आवाहनावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी रोज पायमल्ली होतेय, हे कोणी शिकवू नये. नांदेड आणि पंढरपूरमध्ये ही संस्कृती दिसली नाही, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणं होती, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.