काश्मीर दहशतवादमुक्त करण्यासंबंधी सैन्यदलाचे मोठे विधान, वाचा सविस्तर

श्रीनगर : लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांचे अनेक कमांडर मागील काही चकमकींमध्ये मारले गेले आहेत, यामुळे काश्मीर खोर्‍यात दोन्ही संघटनांच्या कारवायांचे नेतृत्व करणारा कुणीच शिल्लक राहिलेला नाही. काश्मीरचे तीन जिल्हे दहशतवाद मुक्त झाले आहेत. दहशतवादमुक्त जिल्ह्यांमध्ये बांदीपोरा, कुपवाडा आणि गांदरबल यांचा समावेश आहे. दोन वर्षांमध्ये काश्मीरमधून दहशतवादाचे उच्चाटन होईल, असा दृढ विश्‍वास काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी व्यक्त केला आहे.

काश्मीरच्या १३ जिल्ह्यांमध्ये अद्याप ८१ दहशतवादी सक्रीय असून यातील २९ स्थानिक तर ५२ विदेशी (पाकिस्तानी) दहशतवादी आहेत. दोन वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचे सुमारे ८० टॉप कमांडर्स होते. सद्यकाळात हिजबुल मुजाहिदीनचा फारुक नल्ली २०१५ नंतर पासून एकमात्र सक्रीय कमांडर आहे. तसेच तो देखील सैन्याच्या रडारवर आहे. नल्ली व्यतिरिक्त आणखी दोन कमांडर सक्रीय आहेत. यंदा काश्मीरमध्ये एकूण १६९ दहशतवादी (१२७ स्थानिक तर ४२ विदेश दहशतवादी) मारले गेल्याची माहिती विजय कुमार यांनी दिली आहे.

पूर्वी काश्मीरमध्ये १५-१८ हायब्रिड दहशतवादी सक्रीय होते. आता देखील बहुतांश हायब्रिड दहशतवादी पुलवामा, शोपियां, कुलगाम, अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमध्ये आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी चालू वर्षात ११९ दहशतवादी मॉड्यूल्सचा भांडाफोड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. चालू वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २९ नागरिक मारले गेले आहेत. यातील ३ जण काश्मिरी पंडित तर १५ काश्मिरी मुस्लीम सामील होते. चालू वर्षात काश्मीरमध्ये कुठलाच मोठा बंद झालेला नाही. इंटरनेट शटडाउन, दगडफेकीच्या घटना आणि चकमकींदरम्यान नागरिकांचा मृत्यू देखील झालेला नाही.