केसीआर म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी आमची एवढी धास्ती का घेतलीय?

पंढरपूर : तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकोली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्या त्यांनी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांवर तोफ डागली. महाराष्ट्रात आताच आम्ही सुरुवात केलीय, एवढी धास्ती का आहे या पक्षांमध्ये? एवढे का घाबरलेत हे लोक? आम्हाला तर तीन चार महिनेच झालेत. मला समजतच नाहीय. भाजपा आरोप करतेय, राष्ट्रवादी काँग्रेसने तर आम्हाला भाजपची बी टीम म्हटले आहे. आम्ही कोणाची टीम नाही, तर शेतकर्‍यांची, गरीबांची, दलितांची टीम आहोत, असे केसीआर म्हणाले.

राव यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलतांना राव म्हणाले की, आजवर किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रात एक पक्ष सांगा ज्याला तुम्ही संधी दिली नाही. काँग्रेसला ५० वर्षे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाला संधी दिलीत. करायचे असते तर यापैकी कोणीतरी केले असते. तेलंगानाच्या छोट्या राज्यात शेतकर्‍यांसाठी सर्वकाही केले जाऊ शकते. जर तेलंगानात या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी केला.

शेतकर्‍यांना विमा का नाही, तेलंगानात जे काही सुरु आहे, ते भुलभुलय्या आहे, ते केले तर महाराष्ट्राचे दिवाळे निघेल असे सांगितले जात आहे, ते खोटे असल्याचे केसीआर म्हणाले. जरूर दिवाळे निघेल, पण नेत्यांचे निघेल आणि शेतकर्‍यांची दिवाळी होईल, असा दावाही त्यांनी केला. आम्ही जेव्हा पंढरपूरला निघालो तेव्हा इथे जरूर या, राजकारण करू नका असे बोलले गेले. मी पंढरपुरात एक शब्द बोललो नाही. पण इथे बोलणार, असे सांगत केसीआर यांनी सत्ताधार्‍यांना प्रत्यूत्तर दिले.