Delhi Election Results 2025 Update : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांसाठी धक्कादायक ठरला आहे. भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत सत्ता काबीज केली असून, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल पराभूत झाले असून, हा दिल्लीच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे.
अरविंद केजरीवाल 12 व्या फेरीपासूनच पिछाडीवर होते. 12 फेऱ्यांनंतर ते 3,000 मतांनी मागे होते. शेवटच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी मतांची भरपाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु भाजपाचे उमेदवार परवेश वर्मा यांनी त्यांना 1,200 मतांनी पराभूत केले. या पराभवामुळे ‘आप’च्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून पक्षाच्या भविष्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेस आणि भाजपाला जबरदस्त धक्का दिला होता. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतून प्रेरित होऊन अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच निवडणुकीत 28 जागांवर विजय मिळवला. त्यांनी त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता.
2015 मध्ये ‘आप’ने 70 पैकी 67 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. 2020 मध्येही पक्षाने 62 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. मात्र, यंदा मद्य घोटाळ्यासह इतर अनेक कारणांमुळे भाजपाने मोठे आव्हान उभे केले आणि अखेर दिल्लीत सत्ता हस्तांतरण घडून आले.
मनीष सिसोदिया यांचादेखील पराभव
अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. जंगपुरा मतदारसंघातून भाजपाचे तरविंदर सिंह मारवाह यांनी त्यांना अवघ्या 600 मतांनी पराभूत केले.
यंदाच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार प्रचार केला. दिल्लीतील मद्य घोटाळा, भ्रष्टाचाराचे आरोप आणि केजरीवाल यांच्या नेतृत्वावर झालेले हल्ले या सगळ्याचा ‘आप’ला फटका बसला. भाजपाने दिल्लीच्या जनतेला विकासाचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क केला आणि त्याचा परिणाम निकालांवर दिसून आला.
दिल्लीच्या राजकारणात नवा अध्याय
या निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव आणि भाजपाच्या विजयामुळे दिल्लीत सत्ता समीकरणे बदलली आहेत. आगामी काळात ‘आप’ पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्या रणनीती आखतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.