नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असतानाच त्यांच्या आपला मोठा फटका बसला आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या एका खासदार आणि आमदाराने आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. ऐन लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदारानेच पक्षाला सोडचिठ्ठी देणं हा आपसाठी मोठा झटका मानला जात आहे.
पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. त्यामुळे या जागा जिंकण्यासाठी आप, काँग्रेस आणि भाजपने कंबर कसली आहे. अशात पंजाबमध्ये मोठा राजकीय भुकंप झाला आहे. जालंधरमधील आपचे खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर पश्चिम येथील आमदार शीतल अंगुराम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात त्यांनी पक्ष सदस्यत्व घेतलं.
भाजप पंजाबमधून स्वबळावर निवडणूक लढत आहे. आप आणि काँग्रेसचीही राज्यात आघाडी झालेली नाहीये. सुशील कुमार रिंकू यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आपला मोठा झटका बसला आहे. कारण या मतदारसंघातून आपने सुशील कुमार यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मंगळवारी लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बिट्टू पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत.