सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले, पहायला गेले अन् धक्काच बसला, मोलकरणीवर संशय

जळगाव : घरातील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेल्या डब्यातून ५ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी झाल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  दरम्यान, घरात धुणी-भांडी करणाऱ्या मोलकरणीनेंच हे दागिने लांबविले असल्याचा संशय कुटूंबियांना केला आहे.

राजमालती नगरमधील सुनीता मोरे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांनी पतीच्या पगारातून शिल्लक राहणाऱ्या पैशातून सुनीता मोरे यांनी चार लाख रुपयांचे १० तोळ्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांचे एक तोळ्याचे कानातील टोंगल, १२ हजार रुपयांचे तीन ग्रॅमचे टॉप्स, ८० हजार रुपयांच्या ६ सोन्याच्या अंगठ्या असा एकूण पाच लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने केले होते. बचतीच्या पैशांतून घेतलेले सोन्याचे दागिने त्या कपाटातील तिजोरीत डब्यात सुरक्षित ठेवत होत्या.

मात्र, १ एप्रिलला त्यांची मुलगी सायली ही कपाटातील दागिने पहायला गेली, असता तिला डब्यामध्ये दागिने दिसून आले नाही. ही बाब तिने त्वरित आई-वडिलांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी स्वतः सोन्याचा शोध घेतला मात्र, १५ दिवस विचारपूस करूनही यश आले नाही.

सुनीता मोरे यांच्याकडे साधारण तीन महिन्यांपासून धुणी-भांडी आणि घर स्वच्छतेसाठी एक महिला कामाला आहे.  घरातील इंत्यभूत माहिती मोलकरणीला असल्याने मोरे कुटुंबीयांनी तिच्याकडे चौकशी केली. मात्र, तिने नकार दिला. अखेर रविवारी मोरे कुटूंबियांनी मोलकरणीविरूध्द शहर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.