खडका एमआयडीसीत अवैधरीत्या ज्वलनशील पदार्थाची साठवणूक

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव –भुसावळ शहरातील खडका एमआयडीसीतील प्लॉट नंबर १३४ मधील एका कंपनीत बायोडिझेल तयार केले जात असल्याच्या संशयातून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी गत रविवार, २२ रोजी कंपनीत छापेमारी करीत दोन टँकरसह दोन कामगारांना ताब्यात घेतले होत. कामगारांना खोलवर विचारणा केल्यानंतरही त्यांच्याकडून माहिती न मिळाल्यानंतर पोलिसांनी या या फॅक्टरीच्या आवारातील दोन टँकर ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुरवठा विभाग व बीपीसीएलच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ज्वलनशील पदार्थांचे नमूने घेवून तपासणीसाठी पाठवण्यात आले होते मात्र पुरवठा विभागाला ाठ दिवसानंतरही अहवाल न आल्याने पोलिसांनी या प्रकरणी स्वतःच तक्रारदार होत कंपनी मालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुरवठा विभागाचा अहवाल न आल्याने गुन्हा

पुरवठा विभागाने अद्याप अहवाल न दिल्याने पोलिसांनी या प्रकरणी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. टँकर पोलिसांच्या ताब्यात असून कंपनीला सील लावण्यात आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींवर निश्‍चित कारवाई होईल, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. दरम्यान, पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे म्हणाले की, बीपीसीएल अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ज्वलनशील पदार्थांचे नमूने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. नमून्यांचा अहवाल येताच पुढील कारवाई केली जाईल.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा

या प्रकरणी हवालदार गणेश रोहिदास राठोड (४५) यांच्या फिर्यादीनुसार, आबीदअली अब्दुल रहेमान अन्सारी (गुजराथ), अनेष हुपा वसावे (२३, मोहपाडा, ता.अक्कलकुवा) व विलास विजय वळवी (१९, डांबरी आंबा, ईटवाई, कुकरमुंडा, जि.वाणी, गुजराथ) यांच्याविरोधात तालुका पोलिसात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७, भांदवि २८५, २८७, ३३६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी कंपनीतून टँकर (जी.जे.२१ टी.५९४३, एम.एच.०४ एफ.जे.२०४०, जी.जे.०३ डब्ल्यू.८८१०) मधून ९८ लाख ५८ हजार रुपये किंमतीचे डिझेल सारखा दिसणारा ज्वलनशील पदार्थ जप्त केला आहे.