खलिस्तानी समर्थकांचे भारतीय राजदूतांसोबत अमेरिकेत गैरवर्तन

न्यूयॉर्क : अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना शीख फुटीरतावाद्यांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील हिक्सविले गुरुद्वारामध्ये ही घटना घडली. सिख फॉर जस्टिस संघटनेशी संबंधित फुटीरतावाद्यांनी संधू यांना घेरण्याचा प्रयत्न केला. हरदीपसिंग निज्जरची हत्या आणि गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न, या दोन्ही घटनांसाठी फुटीरतावादी नेते भारताला जबाबदार धरत होते.

राजदूत संधू यांच्याशी झालेल्या धक्काबुक्कीच्या वृत्तावर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांची प्रतिक्रिया आली आहे. सिरसा म्हणाले की, भारतीय राजदूताचे वडील तेजा सिंग समुद्री यांनी स्वातंत्र्यापूर्वी गुरुद्वारासाठी ‘की फ्रंट’ लढाई लढली होती. त्यांच्याशी अशाप्रकारचे गैरवर्तन अजिबात योग्य नसून मी त्याचा निषेध करतो.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू पंजाबमधील शीखांसाठी वेगळ्या राज्याचे समर्थक आहेत. खलिस्तानच्या स्वतंत्र शीख राज्याची मागणी करणाऱ्या शीख फॉर जस्टिस (SFJ) चा तो प्रवक्ता आहे. पन्नू पंजाबमधील अमृतसरच्या खानकोटचा आहे. वडील मोहिंदर सिंग पंजाब स्टेट अॅग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्डात काम करत होते. आईचे नाव अमरजीत कौर आहे. पन्नूला एक भाऊ देखील आहे ज्याचे नाव मगवंत सिंग पन्नू आहे. 2020 मध्ये भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले.