खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंगला पाकिस्तानात घरात घुसून घातल्या गोळ्या

नवी दिल्ली : पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची हत्या करण्यात आलीये. लाहोरच्या जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी घुसून परमजीत सिंग पंजवाड याच्यावर गोळीबार केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पजवाड हा मलिक सरदार सिंग हे नाव वापरून लाहोरमध्ये राहत होता. पजवाड हा खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या होता.

परमजीत सिंग पंजवाड हा १९९० मध्ये भारतातून पळून पाकिस्तानात लपला होता. त्याने स्वतःची दहशतवादी संघटना खलिस्तान कमांडो फोर्सची स्थापना केली. पाकिस्तानातून त्याने दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या होत्या. भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयानं २०२० मध्ये दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये परमजीत सिंग पंजवाडचं नाव होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता हल्लेखोर दुचाकीवरून सोसायटीत घुसले होते. हल्लेखोरांनी परमजीतसिंग पंजवाड याच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. यामुळे खलिस्तानी हादरले आहेत. याबाबत अद्याप कुणीही या हत्येची जबाबदारी स्विकारलेली नाही. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी पोलिसांनी या हत्येचा तपास सुरु केला आहे.