खान्देशी शेवभाजी बनवा ‘या’ सोप्प्या पद्धतीने

तरुण भारत लाईव्ह । १ एप्रिल २०२३। हॉटेल मध्ये खान्देशी शेवभाजी आपण नेहमी खाल्ली असेल, पण घरी जर हॉटेल स्टाईल खान्देशी शेवभाजी बनवायची असेल तर या  एका सोप्प्या पद्धतीने खान्देशी शेवभाजी घरी बनवू शकता. खान्देशी शेवभाजी घरी कशी बनवावी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
तिखट मध्यम जाड शेव १ वाटी, तिखट शेव बारीक वाटून १ लहान चमचा, १ मोठा कांदा, १ टोमॅटो मध्यम, सुक्या खोबऱ्याचे ३/४ वाटी उभे पातळ काप, ८ ते १० लसणाच्या पाकळ्या, आलं २ इंच, धणे १/२ लहान चमचा, जिरं १/२ लहान चमचा, शेवभाजी मसाला १ मोठा चमचा, लाल तिखट १/२ लहान चमचा, हळद १/४ लहान चमचा, कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे, मीठ चवीनुसार, तेल २ मोठे चमचे (१ लहान चमचा तेल कांदा भाजायला), पाणी गरजेनुसार.

कृती 
सर्वप्रथम, एका कढईत सुकं खोबरं, धणे व जिरे घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि ताटात काढून ठेवा. कढईत १ लहान चमचा तेल घ्या व त्यात कापलेला कांदा घालून मंद आचेवर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या. मग गॅस बंद करून भाजलेला मसाला थंड करून घ्या. आता भाजलेला मसाला, आलं, लसूण, सर्व मिक्सरमध्ये घाला व थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या. मग कढईत तेल घेऊन ते तापल्यावर आच मध्यम करून त्यात वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर शेवभाजी मसाला, लाल तिखट, हळद व चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतवून घ्या. मग तिखट बारीक वाटलेली शेवपावडर घाला व मसाला एकजीव करुन घ्या. नंतर थोडंसं गरम पाणी घालून मिश्रण अजून एकजीव करा व २ ते ३ मिनिटं झाकण ठेवून द्या, म्हणजे मसाल्यातले तेल वर येईल (तरंगेल) मग गरजेनुसार गरम पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्या आणि रस्सा चांगला उकळू द्या आणि गरमागरम खान्देशी शेवभाजी सर्व्ह करा.