खारघर दुर्घटना : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहचला आहे. त्यापैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हते, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, यावरुन आता सध्या राज्यातलं वातावरण तापलेलं आहे. अशातच आता राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता राज्य सरकारने आता समिती नेमण्याची घोषणा केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1649012284973531136?s=20/

भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल, असं सरकारकडून निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे.