नवी मुंबई : खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १४ वर पोहचला आहे.
त्यापैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हते, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली, आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं.
महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणीसाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास झाला. पण ही महत्त्वाची बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.