खारघर दुर्घटना : अजित पवार यांची धक्कादायक माहिती

पुणे : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत किती लोक दगावले याचा अजूनही सस्पेन्स कायम आहेत. सरकारी आकड्यानुसार या दुर्घटनेत 14 लोक दगावले आहेत. त्यापैकी १२ जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाललं नव्हते, असं पोस्ट मॉर्टम अहवालात स्पष्ट झालं आहे. उर्वरित दोन जणांनी काही खाल्लं होतं की नाही ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.

तर ठाकरे गटाच्या आरोपानुसार या दुर्घटनेत किमान 50 लोक दगावल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ अति भयानक असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही हे व्हिडीओ आणि फोटो भयानक असल्याचं सांगितलं आहे.

ही दुर्घटना घडत असताना काही लोक चांदीच्या ताटात जेवताना दिसत आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते.

चौकशी करा
खारघरमध्ये जे घडलं त्याची जबाबदारी सरकारची आहे. कारण सरकारने कार्यक्रम घेतला होता. खारघर दुर्घटनेत किती मृत्यूमुखी पडले याबाबतच्या आकड्यात तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी मी राज्यपालांकडे केली आहे. असे अजित पवार म्हणाले.