जळगाव : चाळीसगावच्या एका गावातील अल्पवयीन मुलाला पळवून नेणाऱ्या एका तरुणास चिंचगव्हाण फाट्याजवळ त्या मुलासह ताब्यात घेतले. चौकशीअंती आरोपी याने त्या बालकासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. योगेश अनार शेमळ्या (२०, ह. मु. भोरस बु.) असे आरोपीचे नाव आहे
७ रोजी १० वर्षीय मुलाला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले. याबाबत भा. न्या. सं. कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दोन पोलिस पथके तयार केली. पहिल्या पथकात पोउनि प्रदीप शेवाळे, सफौ युवराज नाईक, विजय शिंदे, श्रीराम कांगणे आणि दुसऱ्या पथकात पोउनि कुणाल चव्हाण, हवालदार संदीप पाटील, प्रवीण सपकाळे, नितीन सोनवणे, विजय पाटील, किरण देवरे यांचा समावेश होता.
पहिले पथक सेंधवा, मध्य प्रदेश येथे खाना झाले आणि दुसरे पथक हे जळगाव जिल्ह्यातच तपासकामी रवाना झाले होते. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाला योगेश अनार शेमळ्या (२०, ह. मु. भोरस बु., ता. चाळीसगाव मूळ जामन्या, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) हा पळवून घेऊन गेल्याबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाली.
पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला काही तासांत मुलासह चिंचगव्हाण फाटा येथून ताब्यात घेतले. मुलाकडे पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपीने बालकासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. बालकाच्या जबाबावरून गुन्ह्यात पोक्सो कायद्यान्वये कलमाची वाढ करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.