जळगाव : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या १५ वर्षीय मुलाची आईने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. खून प्रकरणी महिलेच्या प्रियकराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी मुलाची आईची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
महिलेचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (३८, रा. विखरण, ता. एरंडोल) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मयताची आई व प्रमोद शिंपी यांच्यातील प्रेम संबंधाची कुणकुण त्यांच्या मुलाला लागल्याने त्याने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला, मात्र दोघांनी मुलाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून त्याचाच काटा काढण्याचा कट रचला होता.
त्यानुसार १६ जानेवारी २०२२ रोजी रावेर येथे कबुतर ठेवण्याचा पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात नेले. बऱ्हाणपूर तालुक्यातील आसीरगड येथील जंगलात नेऊन तेथे गळफास देऊन ठार मारले व झाडाला मृतदेह लटकवून दोघे जण परत आले. दुसऱ्या दिवशी मुलगा सापडत नसल्याने मुलाच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.
तपासात धागेदोरे प्रमोद शिंपीपर्यंत पोहचले व पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्याच्यासह मयत मुलाच्या आईला अटक केली होती. तेव्हापासून शिंपी हा कोठडीत होता तर महिला जामिनावर होती.
हा खटला न्या. एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात चालला. खटल्यादरम्यान एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.
यात प्रमोद शिंपी याचा मित्र, तपासाधिकारी, जळगावचे कोतवाल, मोबाइल सीडीआरविषयी तांत्रिक माहिती देणारे व इतरांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्ष या आधारावर प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर पुराव्याअभावी मयत मुलाच्या आईची निर्दोष मुक्तता करण्यात आली.