धुळे : तरुणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेमुळे धुळे पुन्हा एकदा हादरले आहे. मोहाडी उपनगराजवळील एका शेतात 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सतीश बापू मिस्तरी वय 30, रा. नित्यानंद सोसायटी, मोहाडी उपनगर. असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील एका शेतात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार मोहाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह कर्मचार्यांनी धाव घेत पाहणी केली. तरुणाची ओळख पटू नये यासाठी त्याच्या चेहर्यावर पूर्णपणे दगडांना मारा करण्यात आला होता मात्र तरुणाच्या हातावर नाव गोंदलेले असल्याने त्यावरून त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे. तरुणाच्या हत्येचे स्पष्ट कारण समोर आले नसले तरी विविध बाजूंनी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. तरुणाच्या परीचयातील काहींची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, बुधवारी रात्री सदर तरुण काही मित्रांसोबत पार्टीसाठी शेतात आल्याची देखील चर्चा असून त्यादृष्टीनेही पोलिसांकडून माहिती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.