नंदुरबार : सोन्याच्या बाळीसाठी ब्लेडने वृध्दाचे कान कापून नेत डोक्यावर वार करुन निघृर्ण हत्या केल्याची घटना बलवंड शिवारात घडली. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील एैचाळे येथील भटा मखन बोरसे यांचे नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात शेत आहे. याच शेतात त्यांनी पत्र्याचे घर बांधले आहे. त्यामुळे भटा बोरसे बऱ्याचदा शेतातच राहत होते. त्यांच्या कानात ७ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी होती. नेहमीप्रमाणे भटा बोरसे हे २५ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शेतात गेले. त्यानंतर ते तेथेच थांबले. दरम्यान, सायंकाळी ते सकाळी ८.३० वाजेदरम्यान मारेकऱ्याने त्यांच्या कानातील सोन्याच्या बाळीसाठी संधी साधत ब्लेडने त्यांचे कान कापले. काहीतरी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार करुन जीवेठार केले.
दरम्यान, घटना २६ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ७८ वर्षीय भटा बोरसे यांचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली होती. याबाबत नंदुरबार तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारात तालुका पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड पथकासह दाखल झाले.
घटनेचा पंचनामा केल्यानंतर भटा बोरसे यांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी ब्लेड आढळून आले आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत मृत भटा बोरसे यांचा मुलगा अशोक बोरसे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात भादंवि कलम ३०२, ३९४, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करत आहेत.