Kiran Kumar Bakale : अखेर किरणकुमार बकाले यांना अटक, पोलीस विभागात खळबळ

जळगाव : मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले अखेर आज, १५ रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली.

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार किरणकुमार बकाले यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे दीड वर्षांपासून फरार होते.

त्यांनी अटकपुर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयासह हायकोर्ट येथे अर्ज केला होता. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी‍ निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता.

दरम्यान, अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवार, १५ रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले आहे. सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांना हजर करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.