शिवसेना खासदार (उबाठा) संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाणून बुजून हा निकाल दिला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. यावर आता भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांचा हात असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. मेधा यांनी राऊत यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. तसेच राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले होते.
संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती. सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. दरम्यान, विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाणून बुजून हा निकाल दिला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.
संजय राऊत नुसते वेगवेगळे दावे करीत असतात. आमच्यावर शंभर कोटीच्या शौचालय भ्रष्टाचार आरोप केला, परंतू एकही कागदपत्र आणू शकले नाही. मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आव्हान देतो की त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका दाखल करावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदक खायला तुमच्या घरी गेल्याने न्यायालय असे निकाल देत असा उल्लेख अपिल याचिकेत करावाच, असे किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.