तरुण भारत लाईव्ह । २२ मार्च २०२३। भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चार प्रकारची नवरात्र वर्षभरात साजरी केली जातात. यामध्ये दोन नवरात्र प्रकट तर दोन नवरात्र गुप्त पद्धतीने साजरी केली जातात. दोन प्रकट नवरात्रांमध्ये चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र यांचा समावेश आहे. शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रालाही अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जाणून घेऊया चैत्र नवरात्र का साजरे केले जाते आणि याचे महत्त्व काय तरुण भारतच्या माध्यमातून.
हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात. चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरे केले जाते. दुसरे नवरात्र जून-जुलै महिन्यात, तिसरे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथे नवरात्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते. या पैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरे केले जाते. तर उर्वरित दोन नवरात्र गुप्तपणे साजरी केली जातात. प्रकट नवरात्रात नवदुर्गेची पूजा केली जाते. तर, गुप्त नवरात्रात सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष मंत्रांचे जप केले जातात. या काळात देवीच्या महाविद्या स्वरुपाची पूजा केली जाते.
चैत्र नवरात्राची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या काळात चैत्र नवरात्र साजरे केले जाते. नवरात्र पूजनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, अशी मान्यता आहे. चैत्र नवरात्र साजरे करण्याचे उद्देश वेगवेगळे मानण्यात आले आहेत.
हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य उगवतो, ती तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे चैत्र प्रतिपदा २२ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र नवरात्राची सुरुवातही २२ मार्चपासून केली जाणार आहे. याच दिवशी नववर्ष सुरू होत असल्यामुळे गुढीपाडवा साजरा करून नववर्षाचे स्वागत उत्साहात केले जाते. चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी या दिवशी नवरात्र समाप्त होईल. ३० मार्च रोजी चैत्र शुद्ध नवमी आहे. म्हणजेच चैत्र नवरात्र २२ मार्च ते ३० मार्च या कालावधीत साजरे केले जाईल.
चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली होती आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी ज्या दिवशी सृष्टीची रचना केली. म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते, अशी मान्यता आहे. तसेच श्रीविष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा रामावतार घेतला होता. म्हणून चैत्र शुद्ध नवमी राम नवमी म्हणून ओळखली जाते. नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी व्रत, पूजन आणि भजन केले जाते. पहिल्या दिवशी दैवी शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, पाचव्या दिवशी स्कंध माता, सहाव्या दिवशी कात्यायणी, सातव्या दिवशी कालरात्री, आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींच्या नऊ स्वरुपाचे पूजन केले जाते.